पुणे : मराठवाडा मित्र मंडळाच्या लॉ काॅलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाने विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्याकडून ५० हजार रुपये घेतले होते. ते तो परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर त्याने धमकी दिल्याने त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज रावसाहेब गर्जे (वय २२, मुळ रा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रावसाहेब गर्जे (वय ४९, रा. पाटसरा, बीड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना विद्यार्थी सहायक समितीच्या गोखलेनगर येथील वसतीगृहात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज गर्जे हा मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेज येथे तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या ओळखीच्या तरुणाने राज याच्याकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. तो ते परत देत नव्हता. परत मागितले तर त्याला धमकावत होता. या त्रासाला कंटाळून राज याने रुमवर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून निरुपम जोशी याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करीत आहेत.