पुणे : रोख रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून दोघा मित्रांनी आपल्याच मित्राची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. निलेश रामदास गुंजाळ (वय ३३, रा. अहमदनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गुंजाळ यांचा मित्र नवनाथ गायकवाड (रा. हडपसर) याने रोख रकमेचे दुप्पट पैसे करून देतो, तुझ्याकडे असलेली रक्कम मला दे. अमर पाटील (रा. नाशिक) नावाचा माझा मित्र आहे तो रक्कम दुप्पट करून देतो असे सांगितले.
गुंजाळ यांनी त्यांच्याकडे असलेली १६ लाख रुपये रोकड गायकवाडला दिली. गायकवाडने पैशांनी भरलेली बॅग स्वतःकडे ठेवली आणि गुंजाळ यांना अमेनोरा मॉल येथे नेले. मॉल जवळ एका टाटा सफारी कारमध्ये आरोपी अमर पाटील बसलेले होते. गायकवाड फिर्यादीना कारजवळ घेऊन गेला. बोलता बोलता बॅगमधून ११ लाख रुपये काढून घेवून गुंजाळ यांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे करत आहेत.