मंचर: शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने ११ जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. त्यात बहुतेक लहान मुले आहेत. यातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. मंचर शहराचे कुलदैवत श्री भैरवनाथ यात्रेला कालपासून सुरुवात झाली. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण झाले होते.
पहाटे तीन वाजल्यापासून एका काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत समोर येईल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. हे कुत्रे रस्त्यावर बेफामपणे फिरत होते. सुलतानपूर रोड, बाजारपेठ,काजीपुरा या भागात कुत्र्याने हल्ला करून अकरा जणांना जखमी केले आहे. विठ्ठल गुंजाळ हे बाजारपेठमधील रस्त्याने चालले असताना अचानक येऊन या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पोटाला चावा घेतला आहे. तर सौरभ प्रमोद कडदेकर हा दुकानापुढे उभा असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून हाताला चावा घेतला.
अंशुमन किरण गुंजाळ या पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडावर कुत्र्याने चावा घेतला. फैजल अब्बासअली कुमेरअली मीर या मुलालाही पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. कुत्र्याने रिजवान शेख (वय ११), सौरभ प्रमोद कडदेकर (वय २५), शहानअली इमानअली मीर (वय ५), फैजल अब्बासअली कुमेरअली मीर (वय ४ ), अंशुमन किरण गुंजाळ (वय ५), मीजत हक्क (वय ३), विठ्ठल मोतीराम गुंजाळ ( वय ६५), कृष्णा समाधान गांगुर्डे (वय ९) व इतर तिघे यांना चावा घेऊन जखमी केले आहे.
''पिसाळलेल्या कुत्र्याचा सकाळपासून नगरपंचायतचे कर्मचारी शोध घेत होते. त्यासाठी बारा कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. मंचर पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यासाठी मदत करत होते. सायंकाळी नगरपंचायतीचे कर्मचारी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या कुत्र्याचा बंदोबस्त केला आहे. नागरिकांनी सावध राहावे. कुणालाही भटकी व चावणारी कुत्री आढळल्यास त्यांनी तातडीने नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा. -गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत''