जातीय समीकरणातून भरणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:54 IST2024-12-16T13:51:39+5:302024-12-16T13:54:25+5:30
पक्षाशी एकनिष्ठ, विकासकामे व जातीय समीकरणात भरणेंनी बाजी मारली असून, माजी मंत्री पाटील यांना मोठा शह मानला जात आहे

जातीय समीकरणातून भरणेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ
- सतीश सांगळे
कळस : सर्वसामान्य माणसांशी असलेली नाळ व विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा विजय खेचून आणल्यानंतर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद देताना जातीय समीकरण साधलं आहे. आमदार दत्तात्रय भरणे धनगर समाजाचे नेते असून, राज्यातील धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे पक्षाला मोठा फायदा होणार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, विकासकामे व जातीय समीकरणात भरणेंनी बाजी मारली असून, माजी मंत्री पाटील यांना मोठा शह मानला जात आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आमदार दत्तात्रय भरणे यांनी कारखान्याचे संचालक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कारखान्याचे संचालक ते अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक ते अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य ते अध्यक्ष, आमदार ते मंत्री असा राजकीय आलेख नेहमीच चढता राहिला. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या हायहोल्टेज अटीतटीच्या लढतीत भरणे यांनी विकासकामांच्या जोरावर संयम बाळगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव करून विकासकामांच्या जिवावर विजय संपादन केला. भरणे यांनी दहा वर्षांच्या कालावधीत आमदार व मंत्री म्हणून केलेली विकासकामे यामुळे सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली.
तालुक्यात सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ भरणे यांनी कधीच तोडली नाही जनतेच्या सुख-दुःखात व अडीअडचणीच्या काळात त्यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर आमदार भरणे यांनी अजित पवारांवर विश्वास ठेवत पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. तसेच तालुक्यात सुमारे सहा हजार कोटींचा विकास निधी आणून सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला. पक्षाशी एकनिष्ठपणा, विकासकामे व जातीय समीकरणे भरणेंना कॅबिनेट मंत्रिपदाची मजल मिळाली आहे.
पाटलांना शह
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांच्यात फारसे सख्य नाही. गेली ३० वर्षे त्यांच्यात अंतर्गत वाद राहिला आहे. त्यामुळे भरणे यांना राजकीय ताकद देऊन पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.