पुणे : गेल्या काही दिवसांपासून सिंहगड परिसरात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे घाट रस्त्यात दरडी कोसळत आहेत. रस्त्यातील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करणे अपेक्षित असताना त्यांनी दुर्लक्ष केले आहे. म्हणून तिथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. वन विभागाने कामासाठीचा निधी विभागाला दिला असूनही त्यावर काम झालेले नाही. पर्यटकांनी फिरायला जाताना जरा जपूनच जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यात आणि गडावरील वाहन तळापासून पाऊलवाटेवर दरड कोसळत आहेत. या दरडी कोसळल्या तेव्हा तिथे मनुष्यहानी झाली नाही, हे सुदैव आहे. परंतु, भविष्यात अशा धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या लावणे आवश्यक आहे. दरडप्रवण क्षेत्रात पर्यटकांनी सावधगिरीने पर्यटन करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
सिंहगडावर जाणाऱ्या घाट रस्त्यात जगताप माची जवळ वळणावरच दरड कोसळली. त्यामुळे सर्व राडारोडा रस्त्यावर आलेला आहे. याच ठिकाणी गेल्या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या काळात दरड पडली होती. गडावर अनेक ठिकाणी धोकादायक जागा आहेत, तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना होणे आवश्यक आहे. घाट रस्त्यातील जगताप माची जवळील दरड प्रवण क्षेत्र हे ठिसूळ मुरमाड असल्याने भिज पावसात भेगाळलेल्या उतारावर पाणी मुरल्याने ढासळत आहे.
पावसाळा सुरू झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर सिंहगडावर फिरायला जात आहेत. म्हणून घाट रस्त्यातील दरडींचा राडारोडा बाजूला करून शक्य तिथे संरक्षक जाळ्या बसविणे आवश्यक आहे. अन्यथो मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खानापूर वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सांगितले. घाट रस्त्यातील दरड प्रवण क्षेत्र निश्चित केलेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घेरा सिंहगड वन संरक्षण समितीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असेही ते म्हणाले.
पर्यटकांनी घाट रस्त्यातून जाताना काळजी घ्यावी
सिंहगड घाट रस्त्यातील दरडी कोसळल्या, त्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. तिथे उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला वन विभागाकडून निधी दिलेला आहे. परंतु, अद्याप या विभागाकडून काहीच उपाययोजना केल्या नाहीत. पर्यटकांनी घाट रस्त्यातून जाताना काळजी घ्यावी. - प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग