पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान अन्न पाण्याचा त्याग केल्याने जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली आहे. त्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडवणीस गृहमंत्री होतात, तेव्हा क्राइम रेट वाढतो. ड्रग्स,हिट अॅण्ड रनच्या केसेस, महिलांवरील अत्याचार वाढले. सरकारवर मायबाप जनतेचा कसा विश्वास राहणार, असे सुळे म्हणाल्या. पुर्णपणे मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने फसवणूक केली. बारामतीत १० वर्षांपुर्वी आंदोलन झाले होते. त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याबाबत शब्द दिला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. त्यानंतर देखील याबाबत निर्णय झालेला नाही. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी केला. आरक्षण प्रश्नावर निर्माण झालेल्या तणावाला राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी केला.
या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला आहे.
सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील
महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा, पोलिसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे. सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील, यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.