पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली.
“लाडकी बहिण योजनेत सहभाग घेणाऱ्या लाभार्थ्यांनी ठराविक अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. सरकारने जाहिरातीच्या माध्यमातून स्पष्ट केले पाहिजे की, योजना सुरू असली तरी त्यासाठी काही अटी महत्त्वाच्या आहेत. जे या अटींची पूर्तता करत नाहीत त्यांनी स्वयंस्फूर्तीनं योजना स्वीकारू नये,” असे भुजबळ म्हणाले.
त्यांनी योजनेच्या तांत्रिक अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केला. “एक मंत्री काही सांगतो, दुसरा काहीतरी वेगळं म्हणतो. मग नक्की काय निर्णय घ्यायचा, हे लोकांना कळत नाही. २५ तारखेला पालकमंत्र्यांनी काही जाहीर केलं, त्यानंतर स्थगिती आली. आता पुढे काय होणार, हे सरकारनं ठामपणे सांगावं,” असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय OBC आरक्षणाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. “OBC आरक्षण सुरळीत राहावे, यावर आमचे लक्ष असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी अभ्यास सुरू आहे,” असे भुजबळ म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहिण योजनेसंदर्भातील गोंधळाबाबत सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.