शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:15 IST2024-12-05T10:53:41+5:302024-12-05T11:15:08+5:30
महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

शपथविधीला जाण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी
पुणे : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. त्यासाठी शहरातील महायुतीचे सर्व शहर, प्रदेश आणि राष्ट्रीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी उद्या मुंबईला जाणार आहेत. त्यासाठी महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेसेना पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
भाजप विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी खास गाड्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपचे पुणे शहर आणि प्रदेश पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख कार्यकर्ते, याप्रमाणे सुमारे ५०० जण या शपथविधी कार्यक्रमासाठी जाणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते असे मिळून सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. शहरातही जल्लोष साजरा केला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.
शिंदेसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक हे उद्या मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. त्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधीला जाण्यासाठी निघणार आहे, असे शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले.
श्रीराम चौकात जल्लोष करणार
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी महंमदवाडीतील हांडे रोडवरील श्रीराम चौकात या शपथविधीचा जल्लोष केला जाणार आहे, असे शिंदेसेनेचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी सांगितले. पुण्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधी सोहळ्यासाठी उद्या मुंबईमध्ये जाणार आहेत.