पुणे : लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त पुणे लोकसभा मतदार संघातील अकरा कर्मचाऱ्यांची प्रकृती मतदानाच्या दिवशी खराब झाली. यामुळे त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे महापालिकेच्या उपआरोग्य अधिकारी तथा कर्मचारी कल्याण कक्षाच्या नोडल अधिकारी डॉ.कल्पना बळीवंत यांनी ही माहिती दिली.
यात वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात नियुक्त राजू दुर्गे यांचा अपघात झाल्याने, त्यांना घाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाजीनगर मतदार संघात मंगेश दळवी यांना चक्कर आल्याने आणि छातीत दुखू लागल्याने कमला नेहरू रुग्णालयात; तर शंकर धोत्रे यांचा अपघात झाल्याने त्यांना घाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोथरुड येथे अविनाश खरुले यांना डाव्या बाजूला अचानक अशक्तपणा सुरू झाल्याने, त्यांना रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पर्वती येथे सुजाता खरात व संतोष देशमुख यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यांना रांका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हडपसर विधानसभा मतदार संघात तुळशीराम घोलप, प्रियांका दराडे, संतोष जोशी, रूपेश वाजे यांना चक्कर येणे, तसेच उलटी व फिट येण्याचे आजार उद्भवले. त्यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विलास कांबळे यांचा अपघात झाल्याने त्यांनाही लागलीच महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ७९६ आरोग्यसेवक उपलब्ध करून दिले हाेते. मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्यसेवक कार्यरत होते. कोणाला वैद्यकीय उपचाराची गरज पडल्यास तत्काळ उपचार मिळावेत, म्हणून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे वरील ११ जणांना वेळीच मोफत उपचार मिळू शकले. या ११ कर्मचाऱ्यांपैकी ८ जणांना डिस्चार्ज दिला असून, तीन जणांवर उपचार सुरू आहेत, असे डॉ.बळीवंत यांनी सांगितले.