ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये आणले. कस्तुरबा गांधी त्यांच्यासमवेत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाडाची काडे करणाऱ्या आपल्या थोर पतीचा दीर्घ सहवास या निमित्ताने प्रथमच कस्तुरबांना मिळाला. त्या समाधानातच बहुधा त्यांनी याच आगाखान पॅलेसमध्ये आपले डोळे मिटले. त्यावेळी हा थोर महात्मा बराच काळ उदास झाला होता.
महात्मा गांधी व कस्तुरबा यांचे सहजीवन आदर्श असेच होते. कस्तुरबांनी आपल्या जगावेगळ्या पतीचे मोठेपण मान्य करत त्यांच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते; तर जगाला सत्याचे प्रयोग करून दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांनी आपल्या पत्नीच्या शब्दांना नेहमीच मान देत आदर केला. त्यांच्या या आदर्श सहजीवनाची अखेर पुण्यात झाली.
या पत्नी-पत्नींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या या सहजीवनाचा अल्पकाळ का होईना, आगाखान पॅलेस साक्षीदार झाला, मात्र कस्तुरबांचे निधन आपल्याच आवारात होईल व या सहजीवनाची अखेर आपल्याला पाहावी लागेल, अशी कल्पनाही पॅलेसने केली नसेल.
मात्र तसेच झाले. इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला. भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला. देशभर चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी सर्व नेत्यांना अटक केली. गांधी वगळता सर्व नेत्यांनी त्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात पाठवले. महात्मा गांधींना मात्र पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले. कस्तुरबांना त्यांच्यासमवेत देण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना या पॅलेसमध्ये आणले गेले. त्यांच्यावर इंग्रज पोलिसांची सक्त नजर होती. त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात कोणताही अडथळा नव्हता, मात्र कोणतीही राजकीय कृती करण्यास त्यांना मनाई होती.
पुढे २२ फेब्रुवारी १९४४ पर्यंत (याच दिवशी कस्तुरबांचे निधन झाले.) हे दाम्पत्य आगाखान पॅलेसमध्येच नजरकैदेत होते. महादेवभाई देसाई हे गांधींजींचे लेखनिकही त्यांच्यासमवेत होते. कस्तुरबांना या निमित्ताने पतीचा सहवास मिळाला. महादेवभाईंनी त्यांच्या दैनंदिनीत दोघांच्याही दिनचर्येविषयी लिहिले आहे. दोघेही एकमेकांचा कसा सन्मान ठेवत याचे उल्लेख त्यात आहेत. महात्मा गांधीजींचे मोठेपण कस्तुरबांनी लक्षात घेतले होते, मात्र तरीही पती म्हणून त्यांच्या गांधीजींकडून अपेक्षा होत्या. गांधीजी त्यांचा आदर करत.
कस्तुरबा आजारी पडल्या, त्यावेळी नेहमी स्थितप्रज्ञ असलेले महात्मा गांधीही सैरभैर झाले होते. नैसर्गिक उपचार करायचे की डॉक्टरचे यावर त्यांची त्यांची स्वत:ची अशी मते होती. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांची प्राणज्योत मालवली. गांधीजी त्यादिवशी खिन्न झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या मुद्रेवरचे प्रसन्न हास्य मावळले होते.
- राजू इनामदार