पुणे: ‘ताम्हिणी घाट जैवविविधतेने अतिशय संपन्न आहे. परंतु, त्या ठिकाणी पर्यटक येऊन प्लास्टिकचा कचरा करतात, इतर कचरा टाकतात. त्यामुळे हे सुंदर ठिकाण विद्रुप होत आहे. सर्वात जास्त तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पहायला मिळतो. निसर्गात जाऊन आनंद घ्यावा, पण तिथे कचरा करू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण ही सुंदरता आपलीच आहे आणि आपणच ती जपली पाहिजे,’’ अशी अपेक्षा उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त बायोस्फिअर्स संस्थेच्या वतीने आयोजित ‘निसर्गसूत्र’ अभियानात (www.nisargasutra.earth) संकेतस्थळाचे अनावरण, ताम्हिणी या संकेतस्थळाचे अनावरण (www.tamhini.earth) अनावरण, फंगी ऑफ वेस्टर्न घाटस् या पुस्तिकेचे प्रकाशन, हरित पत्रकाचे अनावरण आणि हरित योद्धांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वने व जैवविविधतेवर आधारित राष्ट्रगीताचे आणि लघुपटाचे सादरीकरण झाले.
सुक्ष्म जीव वनांसाठी महत्त्वाचे काम करतात
यंदा वन आणि आरोग्य ही संकल्पना आहे. वन समृद्ध असतील तर त्यातील छोटे जीव चांगले राहतील. कार्बन शोषणाचे कामे ही वने करतात. त्यामुळे आपण त्यांचे ऋणी असायला हवा. निसर्गसूत्रचे अनावरण आज झाले. निसर्गसूत्रमध्ये ताम्हिणीतील सर्व निसर्गातील घटक समोर यावेत हा उद्देश आहे. तिथली जैवविविधता समृद्ध आहे. सुक्ष्म जीव वनांसाठी महत्त्वाचे काम करतात. त्याविषयी लोकांना माहिती होणे आवश्यक आहे. - डॉ. सचिन पुणेकर, संस्थापक, बायोस्फिअर्स
लोकांनी सहकार्य केले तर वन्यजीवांचे संरक्षण
प्रविण म्हणाले, दोन-तीन वर्षांपूर्वी वारजे परिसरात गवा आलेला. तेव्हा त्याचा जीव गेला. पण आता लोकांमध्ये जागृती झाली आहे. त्यामुळेच काल वारजेत आलेला बिबट्याला सुखरूप पकडता आले. लोकांनी सहकार्य केले तर वन्यजीवांचे संरक्षण करता येते. - एन. आर. प्रविण, मुख्य वनसंरक्षक
जलप्रवाह थांबल्यामुळे परिसंस्था विस्कळीत
केवळ झाडंच नाही तर संपूर्ण परिसंस्था जपली पाहिजे. वेटलॅन्ड ला वेस्टलॅन्ड समजले जाते. नद्यांना अडवून ठेवलंय. नदीकाठी जैवविविधता होती, ती संपली आहे. पाण्यातील जीवनचक्र अडथळे आले आहेत. जलप्रवाह थांबल्यामुळे परिसंस्था विस्कळीत होते आहे. त्यांचे संरक्षण व्हायला हवे. - संजय खरात, प्राचार्य, मॉर्डन कॉलेज