तन्मय ठाेंबरे
पुणे : कुस्तीची तालीम म्हटले की आपल्या डाेळयांसमाेर येते पंधरा बाय पंधरा किंवा वीस फुटाचा मातीचा आखाडा. मात्र, कात्रज येथे एक अशी तालीम आहे जिचा विस्तार सहा ते सात एकरांत आहे तर मातीचा आखाडा हा शंभर फुटांहून माेठा आहे. मामासाहेब माेहाेळ तालीम ही पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात माेठी तालीम असून अनेकांना हे माहीत देखील नाही. या तालमीने नामांकित कुस्तीगीर घडवले आहेत.
कुस्ती हा लाल मातीतला खेळ आहे. या खेळाची मजाच काही और आहे. या आगळया वेगळया खेळाविषयी प्रचार प्रसार करण्यासाठी दरवषी २३ मे हा ‘जागतिक कुस्ती दिन’ म्हणून पाळला जाताे. सध्या कुस्ती या खेळाला ग्लॅमर आलेले आहे. अनेक मुले लहानपणापासून इतर खेळाबराेबरच या खेळाकडेही वळत आहेत.
मामासाहेब माेहाेळ ही महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघटनेची सन २००० पासूनची एकमेव तालीम आहे. येथे काेकण, विदर्भ, भाेर, मुळशी यासह संपूर्ण महाराष्ट्रातून दीडशे मुले कुस्तीचे धडे गिरवतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण, अगदी तीन ते चार वषार्चे छाेटे वस्ताद येथे निवासी राहून शिकतात. परंतू त्यांच्यासाेबत पालक हवा असताे. तर सात वर्षाच्या पुढील मुले एकटे राहून शिकतात. येथे माती तसेच मॅट या दाेन्ही प्रकारातील कुस्ती खेळता येते. एकाच वेळी येथे शंभर कुस्तीपटू खेळू शकतात हे विशेष.
या तालमीने घडवले हिंदकेसरी कुस्तीपटू
या तालमीने राेहित पटेल, अक्षय शिंदे, सुरज निकम हे तीन हिंदकेसरी कुस्तीपटू घडवलेले आहेत. याचबराेबर अमाेल बुचडे, याेगश दाेडके, सययद चाउस , विजय चाैधरी, हे नामांकित कुस्तीपटू देखील या तालमीतून घडलेले आहेत. येथे राहण्यासाठी शंभर रूम आहे. एका रूममध्ये तिघे चाैघे राहू शकतात. दिवसाआड मॅट व माती यावर प्रॅक्टिस घेण्यात येते. येथे १३ पेक्षा जास्त वयाेगटातील मुलांची संख्या जास्त आहे. सकाळी पाच वाजता उठल्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करण्यात येते. पुढेही टप्प्याटप्प्याने प्रॅक्टिस करण्यात येते.
''कुस्ती हा खेळ नसून संस्कृती आहे. हा मातीतला खेळ आहे. ऑलिंपिक ला अनेक कुस्तिपटूंनी मेडल पटकावले आहेत. तसेच कुस्तीवर अनेक चित्रपटही येउन गेले. तालमीत संस्कार वेगळे असतात. या कारणांमुळे आता कुस्तीकडे कल खूप वाढला आहे व त्याची आवडही वाढली आहे. कुस्ती वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहाेत. ज्याप्रमाणे मॅटची कुस्ती वाढली आहे. त्याप्रमाणे मातीची कुस्ती देखील वाढली पाहिजे. आपली लाल मातीची कुस्ती ऑलिंपिकला गेली पाहिजे. परदेशातील बीच रेस्लिंग ऑलिंपिकमध्ये आणण्यासाठी इतर देशांचे प्रयत्न सूरू आहेत. त्याप्रमाणे आपली लाल मातीवरील कुस्ती तेथे घेउन जाण्याचा आमचा प्रयत्न सूरू असल्याचे मामासाहेब माेहाेळ तालीमचे वस्ताद (प्रशिक्षक) पंकज हरगुडे यांनी सांगितले. ''