लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हडपसर, पुणे येथील सिटी कॉर्पोरेशनच्या अमनोरा पार्क टाउन या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे ही म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या उपाध्यक्षांना दिले आहेत.
म्हाडा उपाध्यक्षांनी याबाबतचा सविस्तर तपशील मागवून चौकशी करावी. चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करावी, असे फडणवीस यांनी बजावले आहे. त्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
कोणालाही पाठीशी घालणार नाही; कारवाई होणार : गृहनिर्माणमंत्री सावेअमनोरा पार्क टाउन या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे ही म्हाडाकडे हस्तांतरित न केल्याची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डरवर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सावे म्हणाले की, चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिकच्या जागेवर उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के सदनिका या गरिबांसाठी अल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यास राखीव ठेवाव्या, असा निर्णय सरकारने २०१३ मध्येच घेतला. त्यानुसार अमनोरा प्रकल्पातील २० टक्के घरे म्हाडाला द्यायला हवी होती. ती त्यांनी तातडीने द्यावीत, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल.
सावे म्हणाले की, मध्यंतरी मी म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी पुणे येथे गेलो असता संबंधित अधिकाऱ्यांना गृहनिर्माण प्रकल्पांमधील राखीव घरे म्हाडाकडे हस्तांतरित न केलेल्यांची यादी तयार करण्यास सांगितले होते. महापालिकांच्या शहरांत गरिबांना १ लाख परवडणारी घरे देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
मुख्यत्वे ही २० टक्के राखीव घरे म्हाडाला हस्तांतरित होतील हे गृहीत धरूनच हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जे बिल्डर आडमुठेपणा करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाईल. मी आजच या संदर्भात म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.