पुणे : हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे, यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र, असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. इयत्ता पाचवीपासून हिंदी व पुढे तर संस्कृत व नंतर अन्य भाषांचा अभ्यास करता येत असतानाही ही सक्ती कशासाठी? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
सपकाळ यांनी शनिवारी दुपारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी झालेल्या वार्तालापात त्यांनी शालेय अभ्यासक्रमात केंद्र सरकारने लागू केलेल्या व राज्य सरकारने स्वीकारलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. सपकाळ म्हणाले, ‘सध्या इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय अभ्यासक्रमात आहेच. त्यानंतर इयत्ता आठवीपासून संस्कृत विषयही आहे. त्यापुढे अन्य भाषांचा, इतकेच काय; पण परदेशी भाषांचाही अभ्यास करता येतो. मग इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा सक्ती करण्याचे धोरण कशासाठी? असा प्रश्न आहे.’
सक्ती करणेच अशास्त्रीय आहे, हे स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले, ‘लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मुळात ० ते ६ वर्षांपर्यंत मुलांना कसलाही शालेय अभ्यास, परीक्षा देऊ नये, असे म्हटलेले आहे. असे असताना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलांना केजी, सिनिअर केजी करायला लावले जाते. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास, अभ्यास करण्याची क्षमता येण्यास वयाच्या ६ व्या वर्षानंतर समज येते. त्यानंतरच शालेय विषय सुरू व्हावेत, असे आहे. त्यात अशी सक्ती करणे व तीसुद्धा भाषा विषयाची, हे योग्य तर नाहीच, शिवाय अशास्त्रीयच आहे.’
आपल्या स्वत:च्या मुलांचे उदाहरण देत सपकाळ म्हणाले, ‘दोघेही साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकले. पुढील शिक्षणात त्यांना कसलीही अडचण आली नाही. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे काम ते करू शकतात.’ हिंदी भाषेची सक्ती करण्याचा विचार तसाच पुढे आलेला नाही, तर त्यामागे हिंदी, हिंदू व हिंदुराष्ट्र, असा विचार असल्याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला. तीन भाषांचे सूत्र देशाने स्वीकारले आहे. मात्र, त्यात कुठेही सक्ती नाही. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व पुढे इयत्ता पाचवीनंतर इंग्रजी आवश्यक, हिंदी ऐच्छिक, त्यानंतर इयत्ता आठवीत संस्कृत; पण तेही ऐच्छिक असे आहे. असे धोरण असताना आता त्यात हिंदी भाषेची सक्ती व तीसुद्धा इयत्ता पहिलीपासून यामागे तोच विचार असल्याचे त्यांनी सांगितले.