पुणे : राज्यात भोंग्याचा राजकीय विषय तापला अन् त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाला. पुण्यात तर चक्क भोंगे विक्रीच घसरली असल्याचं चित्र बघायला मिळतंय. पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दौरे वाढले आहेत. पक्षबांधणी आणि येत्या निवडणुका लक्षात घेत काही धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन याकडे राज ठाकरे यांनी कटाक्षाने लक्ष घालायला सुरुवात केलीये. ३ मे ला म्हणजे ईदच्या दिवशी मशिदी वरील भोंगे काढले नाहीत तर मशिदी समोरच दुप्पट आवाजात भोंगे लावू अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.
त्यानंतर भोंगे वापरण्यावरून अनेक चर्चा रंगल्या. याच पार्श्वभूमीवर लोकमतने पुण्यातील भोंगे विक्री होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये संपर्क साधला. या भोंगे विक्रेत्यांशी बोलून कळले, की भोंग्यांची निर्मिती पुण्यामध्ये होत नाही. ते बाहेरून मागवून दुकानदार केवळ इथे विक्री करतात. शहरात मशिदीवर लावण्यासाठी किंवा फार तर फार सार्वजनिक उत्सवांमध्ये भोंग्यांचा वापर होतो. पण आता शहरी भागातून भोंग्यांची मागणी घटली आहे. ग्रामीण भागातून यात्रा किंवा बैलगाडा शर्यतीसाठी भोंगे खरेदी केली जाते. पोलीसही दुकानदारांकडे जाऊनही भोंगे विक्री बाबत विचारत असल्याची माहिती पुढे आलीये. भोंगे विक्री करणारे इलेक्ट्रॉनिक मार्केट मधील दुकानदारांशी लोकमतने या सर्वांसंदर्भात संवाद साधला.
२५ टक्केच विक्री सुरु
सध्या पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत जोरात सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी भोंगे विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. पण यंदा मात्र २५ टक्केच बिक्री झाली आहे. भोंग्याच्या राजकीय चर्चेने व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे असे असे दुकानदार राजेश अगरवाल यांनी सांगितले.
दोन ते तीन भोंगे विकले जातात
पूर्वी महिनाभरात २५ ते ३० तरी भोंगे विकले जात होते. आता मात्र तीच संख्या २ ते ३ वर आली आहे. शहरातून तर कोणीही भोंगे विकत घयायला येत नाही. आताच्या परिस्थितीत ग्रामीण भागातूनच भोंगे खरेदीसाठी थोडेफार नागिरक येत आहेत असे दुकानदार गुरजित सिंग यांनी सांगितले.