पुणे : दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ते परराज्यात पळून गेले. पण त्याने तिच्याशी लग्न न करताच शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान, तिच्या वडिलांनी तिला फूस लावून कोणीतरी पळवून नेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ते दोघे मिळून आल्यानंतर सुरुवातीला तिने न्यायालयात प्रियकर आरोपीविरुद्ध विरुध्द साक्ष दिली. त्यानंतर आरोपीने शिक्षा होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न केल्यामुळे तिने आरोपीविरुद्ध उलटतपासात आरोपीच्या बाजूने व सरकार पक्षाविरुध्द साक्ष दिली. मात्र याप्रकरणात न्यायालयाने पीडितेस फितूर साक्षीदार घोषित करत, आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली.
राकेश आणि माधुरी (नाव बदलले आहे) अशी त्यांची नावे आहे. ती 16 वर्षांची तर तो 24 वर्षांचा. 30 जानेवारी रोजी माधुरी हिच्या वडिलांनी तिला महाविद्यालयात सोडले. त्यानंतर तिच्या आईने शिक्षिकेला शाळा कधी सुटणार असा मेसेज केला. तेव्हा माधवी वर्गात आली नसल्याचे शिक्षिकेने सांगितले. त्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी माधुरीला फूस लावून कोणीतरी पळवून नेल्याची लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान, ती राकेशबरोबरगेल्याचे निष्पन्न झाले. अखेर,राकेश याला अटक करण्यात आली. यादरम्यान, राकेश याने तिच्याशी वेळेवेळी शारिरीक संबंध ठेवल्याचे वैद्यकीय तपासणीदरम्यान समोर आले. त्यानंतर राकेशविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
याप्रकरणात, विशेष सरकारी वकील ए. एस. ब्रम्हे व शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे त्यांनी चार साक्षीदार तपासले. यामध्ये, वैद्यकीय अधिका-याची साक्ष महत्त्वाची ठरली.
युक्तिवादादरम्यान, अॅड. देशमुख म्हणाल्या, मुलींना पळवून न्यायचे, गुन्हे करायचे आणि केवळ शिक्षा होऊ नये म्हणून पीडितेशी लग्न करायचे या प्रवृत्तीला आळा बसायला हवा, अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत यासाठी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली. वैद्यकीय पुरावा, सी. ए. अहवाल व तपासी अधिका-याची साक्ष महत्त्वाची मानत विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांच्या न्यायलयाने पीडित मुलगी फितूर होऊन देखील सरकार पक्षाने दिलेला पुरावा ग्राह्य मानून आरोपीस वीस वर्षांची शिक्षा सुनावली.