पुणे : मॉन्सूनने शुक्रवारी (दि.२८) देशातील आणखी काही भाग व्यापला आहे. त्यामध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, छत्तीसगडचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मॉन्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने शुक्रवारी (दि.२८) सायंकाळनंतर ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदूर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातीलपुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट आहे. खान्देश आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
शनिवारी (दि.२९) आणि रविवारी (दि.३०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील घाटमाथा, पूर्व विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
दरम्यान, शुक्रवारी माॅन्सूनने संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला आहे. तसेच राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला आहे. पुढील २ ते ३ दिवसात माॅन्सून देशातील उर्वरित भागात पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.