पुणे : ‘सध्या जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर उपाय करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून सर्वांनी मुलगा किंवा मुलगी २० वर्षांची झाली की, त्यांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा अधिकार द्यावा. ही पिढी समंजस आहे, ते योग्य जोडीदार निवडतील. पण अट एकच असेल की, त्यांनी आपल्याच समाजातील जोडीदार निवडला पाहिजे. त्यासाठी त्यांना आपण सर्व अधिकार देऊया,’ असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.
पुण्यामध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. त्याचा रविवारी (दि. १) दुसरा दिवस होता. मुथ्था यांनी सर्व उपस्थितांना या विषयावर शपथ घ्यायला लावली. ‘नई सोच, नई राह, निश्चिंत होकर तय करें विवाह’ या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी नवनियुक्त नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचे सदस्य राजेंद्र लुंकर, नंदकिशोर साखला, गौतम बाफना, संप्रती शिंगवी, संजय शिंगी, प्रफुल्ल पारख, कोमल जैन, डॉ. पंकज चोपडा, दिनेश पारलेचा, प्रदीप संचेती, विलास राठोड, दीपक चोपडा, ज्ञानचंद आंचलिया, श्रीपाल खेमलपुरे, निरंजन जैन, ओमप्रकाश लुनावत, रमेश पटवारी, विजय जैन, राहुल नाहटा, आदेश चांगेडिया आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रामध्ये ‘प्रतिबंब’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यामध्ये नंदकिशोर साखला यांनी सूत्रसंचालन केले तर मनोज लुंकड, प्रकाश गुलेचा, आरती लोढा, श्रवण डुगर, विजय जैन यांनी सहभाग घेतला. त्यानंतर तरुण पिढीकडून ‘परिवर्तन के लिए मंथन, पीढियों को जोडती सीढियां’ यावर मनोगते व्यक्त झाली. त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला तसेच एक नाटिकाही सादर केली. त्यात नव्या व जुन्या पिढीतील विसंवादाविषयी भाष्य करण्यात आले. दोघांनी समजून घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला.
त्यानंतर मुथ्था यांनी ‘विवाह’ या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले, ‘सध्या जैन समाजामध्ये विवाह ही खूप मोठी अडचण बनली आहे. बऱ्याच जणांचे शिक्षण सुरू असते आणि त्यामुळे घरातील माणसांना ते शिक्षणासाठी लग्न नंतर करू, असे सांगतात किंवा पुढे ढकलतात. परिणामी, नंतर वय निघून जाते आणि वय झाल्यामुळे लग्न लवकर जमत नाही. तेव्हा काहीच पर्याय हातात उरत नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत. आपली नवी पिढी हुशार आहे. त्यांच्यावर आपल्याला अभिमान असला पाहिजे. ते जे करतील, ते योग्य करतील. हा विश्वास ठेवून त्यांना तुम्हीच लग्नासाठी जोडीदार निवडा, असे सांगा आणि तो आपल्या समाजातील हवा, एवढीच एक अट घाला.’ देशपातळीवर भारतीय जैन संघटनेतर्फे नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल म्हणून कार्य करण्यात येईल. त्यातील सदस्यांची घोषणा करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अधिवेशनाचा समारोप झाला.
राष्ट्रसेवेसाठी योगदान !
दुपारच्या सत्रामध्ये प्रफुल्ल पारख यांनी राष्ट्रसेवेसाठी प्रत्येकाला आवाहन केले. जैन धर्मीयांतून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती दानधर्म करून देशसेवा करत असतात. त्यांनी भारतीय जैन संघटनेसोबत राष्ट्रसेवेसाठीदेखील योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले.