कल्याणराव आवताडे
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका शेतकऱ्याने ‘सरपंच’ व ‘आमदार’ नावाची कोल्हापूरची खिलारी बैलजोडी तब्बल सहा लाख एकावन्न हजाराला विकत घेतली आहे. एवढ्या मोठ्या किमतीचे बैल विकत घेतल्याने हौसेला मोल नसते, याची प्रचिती आली आहे. पांडुरंग उर्फ तात्या ज्ञानोबा चौधरी असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी गडहिंग्लज येथील शेतकरी काशिनाथ बेळगुद्री यांच्याकडून ही बैलजोडी विकत घेतली आहे.
पांडुरंग चौधरी हे सिंहगड रस्ता भागातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. या यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलजोडीच्या सहाय्यानेच शेतीची कामे करण्यास ते पसंती दाखवतात. त्यांच्या मते ज्या शेतकऱ्याकडे बैलजोडी नाही तो शेतकरीच नाही. बैलजोडी ही शेतकऱ्याची आन, बान आणि शान आहे. ज्यावेळी बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती, त्यावेळेपासून त्यांनी शर्यतीसाठी बैल नेणे बंद केले. त्यांच्याकडे एकूण ५ बैल आहेत. बीट, गाजर, मक्याचे कणीस, गव्हाचे कणीस, शेंगदाणा पेंड, भुसा व इतर बैलांच्या खाद्यासाठी दररोज अडीच हजार रुपये खर्च करतात. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, सध्या ते पूर्णवेळ शेती करतात. गेल्या ३६ वर्षांपासून दर बैलपोळ्याला ते नवीन बैलजोडी आणतात. चौधरी यांचे बैल दरवर्षी कर्वेनगर येथील शहीद मित्रमंडळातर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीमध्ये दरवर्षी मिरवणुकीला असतात. या कामात त्यांना भाचा अमित शेलार ही मदत करतात. या यांत्रिकीकरणाच्या युगातही शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने करण्यास पसंती देतात. केवळ हौसेपोटी घेतलेली सरपंच व आमदार ही बैलजोडी कोणालाही भावेल एवढी मनमोहक दिसत असून, सोशल मीडियामध्ये अनेक शेतकऱ्यांना या बैलजोडीने मोहून घेतले. या बैलजोडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ही जोडी रातोरात ‘फेमस’ झाली आहे.
बैलांशी पिता-पुत्राप्रमाणे नाते...
माझे आणि दावणीला बांधलेल्या बैलाचे नाते हे अगदी पिता-पुत्राच्या नात्याप्रमाणे आहे. आम्ही आपल्या दावणीला बांधलेल्या जनांवरावर अतोनात प्रेम करतो. दावणीला बांधलेली जनावरे ही आम्हा शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यच असतात. खरंतर अनेक शेतकरी हे खूप हौशी असतात. ते आपल्या दावणीला जातिवंत बैल ठेवतात. अलीकडे ट्रॅक्टरच्या वापरामुळे बैलजोडीचे प्रमाण कमी झाले असले, तरीदेखील काही हौशी शेतकरी शेतकऱ्याची शान म्हणून बैलजोडी आवर्जून बाळगतात. मला दोन मुली आहेत. त्यांची लग्नं झाली आहेत. ही परंपरा गेल्या सहा पिढ्यांपासून आहे. माझ्या माघारी ही परंपरा खंडित होणार, याची खंत वाटत असल्याचे पांडुरंग चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
''धारेश्वरवरून आमच्या गावाचे नाव धायरी पडले आहे. महादेवाचे वाहन व शेतकरी म्हणून बैलांना आम्ही अनन्यसाधारण महत्त्व देतो. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी आम्ही दरवर्षी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. - पांडुरंग चौधरी, प्रगतशील शेतकरी, धायरी''