सणसर (ता.इंदापुर) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज इंदापूर तालुक्यात प्रवेश झाला. इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे संचालक अँड रणजीत निंबाळकर, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर,कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी पालखीचे स्वागत केले.
आज पालखीचा दहाव्या दिवशीचा मुक्काम सणसर तालुका इंदापूर येथे आहे. लाखो वारकरी दिंडीच्या माध्यमातून पालखी बरोबर पायी वारीत सहभागी आहेत. लांबलेला पाऊस आणि कडक ऊन असताना देखील पायी चालणारे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद पहावयास मिळत आहे. अनेक लहान, थोर,आबाल वृद्ध मंडळी पालखीमध्ये सहभागी आहेत.आज दुपारी तीन वाजता छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोरील प्रांगणात दुपारच्या विसाव्यासाठी पालखी थांबल्यावर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांच्या पत्नी वैशाली पाटील यांच्या हस्ते कारखान्याच्या वतीने पूजा करण्यात आली.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पालखी मुक्काम तळाची केली पाहणी
सणसर येथे आज पालखी मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सुरक्षेची पाहणी करून पालखीचे दर्शन करत असताना भाविकांची गर्दी होणार नाही. योग्य प्रकारे बॅरिकेट्स लावून दर्शन रांग बनवणे विषयी सरपंच पार्थ निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, सागर भोईटे, ग्रामसेवक महादेव पोटफाडे यांच्यासह सर्व शासकीय खात्याचे प्रमुख अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.