'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By निलेश राऊत | Published: May 10, 2023 05:53 PM2023-05-10T17:53:33+5:302023-05-10T17:54:15+5:30
काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय
पुणे: दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
मुळीक म्हणाले, 'हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील ३२ हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून 'इसिस' या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहता येईल. सध्या हा चित्रपट शहरातील सर्व सिनेमागृहात हाऊस फुल चालला असून, चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्ग ही मोठ्या प्रमाणात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी'(The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्याची मागणी होत असताना, आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अदाह शर्मा या मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर अनेकांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. पण, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पास केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण, तामिळनाडूसह पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील या चित्रपटाने पाच दिवसांत 55 कोटींचा गल्ला जमवला आहे.