फुले वाडा स्मारकाच्या आजूबाजूची जागा मोठ्या प्रमाणात घेतली जाणार - अजित पवार
By राजू हिंगे | Published: April 11, 2024 07:02 PM2024-04-11T19:02:43+5:302024-04-11T19:03:04+5:30
सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्याच्या कामातही कोणत्याही प्रकारच्या निधीची अडचण भासणार नाही
पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ आम्ही सगळ्यांनी मिळून ठरविलेले आहे. मुळातच स्मारक झालेले आहे, परंतु जागा फार कमी पडत आहे. म्हणूनच आजूबाजूची मोठ्या प्रमाणात जागा घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले वाड्यात हजेरी लावून अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले,''सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींच्या सुरू केलेल्या पहिल्या शाळेची जागा ताब्यात घेतली आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्याचे पाच-सहा नियोजन आराखडे तयार झाले आहेत. सर्वाधिक लोकांची मान्यता मिळेल, तो नियोजन आराखडा मान्य होईल आणि त्यानंतर तेथे काम सुरू होईल.'' या कामातही कोणत्याही प्रकारच्या निधीची अडचण भासणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.
गेल्या ४० वर्षात राज्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम ज्यांनी केले, त्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथराव खडसे, नितीन गडकरी यांचे नाव घेता येईल. परंतु उत्तर महाराष्ट्रात भाजप सर्वदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम खडसे यांनी केले आहे. मी राजकारणात आल्यापासून तिथे खडसे यांचे प्रभुत्व होते. परंतु काही कारणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, आता त्यांनी घरवापसी केली आहे.सातारा, नाशिक, कोकण येथील जागा वापटपाबद्दल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आम्ही चर्चा करून योग्य मार्ग काढू, असेही पवार यांनी सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याने महायुतीला नक्कीच फायदा होईल असेही पवार यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारें यांच्या बाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, वर्षा बंगल्यावर मी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसह बसलो होतो . तेव्हा त्यांच्या भागातले महत्त्वाचे विषय मांडले. त्यावेळी विजय शिवतारे म्हणाले की मी महायुतीबरोबर आहे, पण ते विषय सरकारनं मार्गी लावायला हवेत असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ११ तारखेला तिथल्या मैदानात सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार आहे”, असं अजित पवार यांनी सांगितले.
“तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी सांगायचं तेवढं सांगितलं आहे.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारें यांना यादरम्यान कुणाकुणाचे फोन आले होते? असा सूचक प्रश्न केला असता अजित पवार त्यावर संतापले. “तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी सांगायचं तेवढं सांगितलं आहे. मला संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे तेवढं मी बोललो आहे”, असं ते म्हणाले.