शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बारावीची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एक पेपर अवघड गेल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना गुरुवारी (दि १०) घडली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पायल रंगनाथ गुंडाळ (वय १७, रा. जकाते वस्ती शिक्रापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी रंगनाथ चिमणराव गुंडाळ (वय ५८, रा. जकाते वस्ती शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पायल गुंडाळ व साक्षी गुंडाळ या दोघी बहिणी दुपारच्या सुमारास घरामध्ये अभ्यास करत होत्या. यावेळी साक्षी ही दुसऱ्या खोलीत गेली. पायल ही एकटीच घरात अभ्यास करत बसली होती. मात्र काही वेळाने पायल हीला आवाज देऊन देखील पायलने दरवाजा उघडला नाही. साक्षीने तिचे वडील रंगनाथ गुंजाळ यांना आवाज देऊन पायल दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांनी आवाज देऊन देखील पायल ने दरवाजा उघडला नाही म्हणून तिच्या वडिलांनी दरवाजा तोडून रूम मध्ये जाऊन पाहिले असता पायलने ओढणीच्या सहाय्याने घरात गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळतात शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, पोलीस नाईक अमोल नलगे, नवनाथ दांगडे यांनी घटनास्थळी आले. त्यांनी जात पंचनामा केला. पोलीसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील मिळून आली आहे. बारावीचे पेपर सुरू असताना पेपर अवघड गेल्याने पायल हिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहे.