पुणे: सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणाला भुरळ पाडुन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने कर्ज घेण्यास लावून त्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव गावठाण येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ताथवडे येथील एका २७ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे़ हाप्रकार आंबेगाव गावठाण, तसेच विविध ठिकाणी जानेवारी २०२२ ते २५ सप्टेबर दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दशरथ बावकर यांची फेसबुकवरुन ओळख झाली. दशरथने फिर्यादीशी गोड बोलून त्याला भुरळ पाडली. फिर्यादीसोबत विविध ठिकाणी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे नग्न फोटो काढून ही बाब कोणाला सांगितली तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ७ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीच्या आईस तुमच्या मुलाला मायग्रेशन चा आजार आहे, असे खोटे सांगितले. फिर्यादीचे आईचे व पत्नीचे २० तोळे सोन्याचे दागिने घेऊन फिर्यादीस पिंपरी येथे मुथुट फायनान्स येथे गोल्ड लोन करण्यास लावले. या कर्जाचे आलेले ६ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीचे ड्रायव्हींग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड धमकावून काढून घेतले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.