वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सुकलवाडी येथे मागील आठवड्यापासून पहिल्यांदाच, बिबट्या दिसल्याने, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात असलेला बिबट्या अखेर वनविभागाने जेरबंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिंचेच्या मळ्यात मागील दोन दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील शेतकरी नारायण पवार, संदेश पवार, महादेव पवार, संतोष पवार आदींनी सुकलवाडी व परिसरातील अनेक ग्रामस्थांनी समोरच बिबट्याने ठिय्या मांडलेला पाहिला. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याचे व्हिडीओ, फोटोही काढले. बिबट्याचे धाडस वाढल्याने आता तो धोकादायक झाला आहे.
सुकलवाडी परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्या दिसल्याचे म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्याचे पुरावे मिळत नव्हते. अखेर रविवार (दि. २७) सुकलवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी, प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाल्याने, तसेच अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आणि या परिसरातील बिबट्याचे अस्तित्व अधोरेखित झाले. दरम्यान, बिबट्याचा फोटो ग्रामस्थांनी मोबाइलमध्ये टिपून वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनविभागाने बिबट्याला पकडण्याची कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत जेजुरी वनविभागाचे वनपाल राहुल रासकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही वेळातच पेट्रोलिंगची गाडी परिसरात पाठवून दिली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड येथील विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, जेजुरी वनपाल राहुल रासकर, वनरक्षक गोविंद निरडे, वनरक्षक परमेश्वर वाघमारे, आनंदकुमार इंदलकर, सागर शिरतोडे, योगेश नजन आदींनी रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्यास ताब्यात घेतले. हा बिबट्या मादी असून, ती एक वर्षाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी रेस्क्यू ऑपरेशन केल्याने अभिनंदन केले; पण परिसरात अजून एक बिबट्या असल्याची चर्चा असल्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण असल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार यांनी सांगितले.
लोकांनी एकट्याने फिरू नये. बिबट्याला कोणत्याही प्रकारे हुसकावू नये. रात्री-अपरात्री बाहेर पडू नका. एखाद्या प्राण्यावर हल्ला केल्यास प्रतिकार करायला पुढे जाऊ नका. त्याचबरोबर पाळीव जनावरांना मारल्यास नुकसानभरपाईसाठी वनविभागाशी त्वरित संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.