पुणे : एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिसणारा वेळ हा मध्यरात्री दीड नंतरचा असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटे पाचपर्यंत पब सुरू असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाला मद्य सेवन करण्यास दिल्याप्रकरणी ब्लॅक आणि कोझी पबच्या मालकासह, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. महिनाभरानंतर त्यांची नुकतीच जामिनावर मुक्तता करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरील द लिक्वीड लिझर लाऊंज उर्फ एल३ हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. याच पबमध्ये तरुण- तरुणी मद्यपान करत होते, शौचालयात काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
एक्साईज विभागाचे अधिकारी चरण सिंग राजपूत यांनीही पुण्यातील या हॉटेल जवळ तातडीने गेल्याने आता प्रकरणाला एक्साईज विभागाकडून देखील कारवाईला सुरुवात झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल असून गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ४ कर्मचारी ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेऊ नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूनचा पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मात्र या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे.