पुणे : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतिक्षा यादी शनिवार दि. २० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवड यादी https://student.maharashtra.gov.in/adm portal या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दि. २२ पासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे.
प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांना दि. २३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेता येणार आहे.
पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थिती पहावी तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.- शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)