Narendra Modi: जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रासह देशाचं नुकसान; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 02:02 PM2024-09-29T14:02:16+5:302024-09-29T14:03:09+5:30
जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत, आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली
पुणे: जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही ती बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. म्हणून आम्ही महिलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळेया प्रकारे प्रयत्न करत आहोत. विकासाबरोबर वारसाही जपणायचा आमचा प्रयत्न असल्याने सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज केले आहे. पुण्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे. आता सुरु झालेला पुण्याचा विकास खूप आधी होणं अपेक्षित होत पण तस झालं नाही. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्याची फाईल तयार झाली तरी धूळखात पडून होती. २००८ साली मेट्रोची चर्चा सुरु झाली. पण आमच्या सरकारच्या काळात मेट्रो प्रत्यक्षपणे धावण्यास सुरुवात झाली. जुनं सरकार ८ वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत. आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगलं काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती
पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती, समाजभक्ती आहे. मी दोन दिवसापूर्वी पावसामुळे पुण्यात येऊ शकलो नाही. पुण्याच्या पावनभूमीला माझा स्प्रश्य न झाल्याने मी स्वतःचे नुकसान झाल्याचे समजत आहे. पण आज मेट्रोचे ऑनलाईन उदघाटन होतंय याचा मला खूप आनंद आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढायला हवी असही त्यांनी सांगितलं आहे.
हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सुरु
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.