बारामती : बारामती शहर आणि एमआयडीसी परीसरातील लॉजवर पोलीसांनी अचानक छापा मारत तपासणी केली . तपासणी दरम्यान शाळांमध्ये शिक्षण घेणारी प्रेमी युगुल सापडली. या कारवाईमुळे लॉजमालकांबरोबरच लपुनछपुन भेटणाऱ्या जोडप्यांचे धाबे दणाणले आहेत.
अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती नगरपरीषदेचे मुुख्याधिकारी महेश रोकडे, शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने हि कारवाई केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष राहण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाला केल्या आहेत. या पार्श्वभुमीवर पोलीसांनी तातडीने कारवाई करण्याच्या मोहिमा आखण्यास सुरवात केली आहे. यामध्ये पोलीस प्रशासन नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
गुरुवारी(दि २७) दुपारी अचानक लॉज तपासणी मोहिमेला सुरवात करण्यात आली. यावेळी १५ लॉजवर पोलीसांनी अचानक छापे मारत तपासणी केली. यामध्ये ११ जोडपी आढळली. पोलीसांनी त्यांची माहिती घेत समज देवुन सोडुन दिले. बारामतीत प्रथमच लॉजची तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.नागरीकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
या कारवाईबाबत अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांनी माहिती दिली.भोईटे म्हणाले, तपासणी दरम्यान मैत्रीणीकडे जाते, कॉलेजला जाण्याचे कारण सांगून काही विद्यार्थी दशेतील मुुले मुली लॉजवर आल्याचे तपासणी दरम्यान आढळले आहे. लॉजवर सापडलेली सर्व मुले मुली सज्ञान आहेत. मात्र,त्यांनी आई वडीलांच्या विश्वासाला या विद्यार्थ्यांनी तडा जावु देता कामा नये, यासाठी पोलीस भविष्यात समुपदेशन करणार आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मदतीने लॉज व्यावसायिकांच्या कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. लॉज मालकांच्या बेकायदा आणि चुकीच्या बाबींवर कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल. कारवाईत फलटण येथील एक विद्यार्थी,तसेच अॅकॅ डमीत शिक्षण घेण्यासाठी येणारी विद्यार्थीनी आढळली आहे. विद्यार्थ्यांना लहान वयात दिशा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीसांचे अचानक छापे टाकुन कारवाई करण्याचे सत्र सुरुच राहणार असल्याचे भोईटे यांनी सांगितले.