पुणे : कोकण गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात १५.३ अंश सेल्सिअस झाली आहे. कमाल तापमान सोलापूर येथे ३९.६ नोंदवले गेले. येत्या दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी वर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. राज्यामध्ये जवळपास सर्वत्र हवामान कोरडे राहणार असून, तापमानाचा पारा चढता राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमान वाढू लागले आहे. काही दिवसांमध्ये हा पारा चाळीशी पार करण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. १५ मार्च नंतर विदर्भात वाऱ्याची परस्पर क्रिया घडून १६ व १७ मार्च रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. या दरम्यान कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
पुण्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहील. १६ मार्चनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. किमान तापमान १३ मार्चनंतर २ डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मात्र बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
राज्यातील कमाल व किमान तापमान
मुंबई - ३०.९ - २०.८पुणे - ३६.९ - १५.३रत्नागिरी - ३२.८ - २०.०जळगाव - ३५.८ - १७.०कोल्हापूर - ३७.१ - २१.५नाशिक - ३५.४ - १५.८सोलापूर - ३९.६ - २४.६नांदेड - ३७.२ - २०.४चंद्रपूर - ३६.२ - २०.८नागपूर - ३७.० - २२.१
एकीकडे खूप तर दुसरीकडे कमी
राज्यात सोलापूरमध्ये सर्वाधिक ३९.६ तापमान झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर पुण्यात सर्वात कमी किमान तापमान १५.३ अंशावर नोंदवले आहे. पुण्यात देखील लोहगावात किमान तापमान १८.९ तर इतर शहरात मात्र १५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरातच हवामानत प्रचंड बदल होत असल्याचे दिसत आहे.