- सायकल हे अनेक वर्षांपासून वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून देशात वापरले जाते. सायकल ही लहान-मोठ्यांना व्यायामासाठी एक सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे, तसेच आपण सायकलिंग हे वर्षाचे बारा महिने नियमितपणे करू शकतो. आपल्या देशात अनेकांच्या जीवनात वाहन चालवायला शिकण्याची सुरुवात ही सायकलपासूनच होते. त्यामुळे पुढे चालून मनुष्य कितीही मोठा झाला तरी सायकल पाहिल्यावर त्यांच्या मनात बालपणीच्या आठवणी नक्कीच जाग्या होतात.
सायकल हे जसे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. तसेच सायकल चालविण्याचे शरीरासाठी अनेक फायदे पण आहेत. नियमितपणे सायकल चालविण्यामुळे फुप्फुस, हृदय, मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज एक ते दीड तास सायकल चालविणे आवश्यक असते.
सायकल चालविण्याचे फायदे
१) स्नायू बळकट होतात.२) हृदय व फुप्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.३) वजन नियंत्रित राहते.४) मधुमेह असेल तर साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.५) हाडे व सांधे मजबूत होतात.६) दिवसा सूर्यप्रकाशात सायकल चालविण्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते.७) इतर वर्कआउटच्या मानाने दुखापत होण्याची शक्यता कमी.८) मानसिक स्वास्थ्य सुधारते कारणं सायकलिंग करते वेळी ऊन, वारा, पाऊस दिवस-रात्र अशा अनेक नैसर्गिक बदलातून जावे लागते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते.९) शांतपणे झोप लागते.१०) शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते.
सायकल चालविताना घ्यायची काळजी
१) सर्वप्रथम सायकलची निवड स्वतःच्या शरीराची उंची लक्षात घेऊनच करावी.२) सायकलची सीट आरामदायी असावी.३) रस्त्यावर सायकल चालवताना चांगल्याप्रकारे हेल्मेट, रात्रीच्या वेळी अंधारात इतरांना दिसण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट किंवा जॅकेट, पाठीमागे व पुढे लाइट असणं आवश्यक आहे.४) सायकल चालवताना सैल कपडे घालू नये.५) रस्त्यावर सायकलिंग करतेवेळी वाहतुकीचे नियम पाळावेत.६) सायकलला पुढील बाजूस स्वतःचे नाव, मोबाइल नंबर व इर्मजन्सी मोबाइल नंबर असलेली माहिती लॅमिनेट करून लावावी.
सामाजिक व राष्ट्रीय फायदे
१) सायकलिंगमुळे अनेक आजार होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. यामुळे निरोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते.२) रस्त्यांवर ट्राॅफिकचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत चालू राहते. तसेच जीवघेण्या अपघातांचे प्रमाण कमी होते व पार्किंगची समस्या निर्माण होत नाही.३) सायकल ही छोट्याशा रस्त्यावर कधीही आणि कुठेही चालवता येते.४) सायकलिंगसाठी इंधनाची गरज नाही. त्यामुळे इंधनासाठी आखाती देशात जाणारा राष्ट्रीय पैसा वाचण्यास मदत होते.५) सायकलिंगमुळे प्रदूषण होत नसल्याने पर्यावरणाचे रक्षण होते, तसेच ध्वनिप्रदूषणही होत नाही.६) सायकलिंगमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत फारच कमी आहे. यामुळे रस्ते दुरुस्तीवर होणारा राष्ट्रीय पैसा कमी खर्च होईल.
''सर्व वयोगटांतील लोकांना सायकल चालविणे हा पर्यावरणपूरक असा एक उत्तम व्यायामाचा प्रकार व वाहतुकीचे साधनही आहे. - डॉ. धनराज हेळंबे पीसीएमसी सायकलिस्ट''