पुणे : भारतात चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवित दलालांनी बांगलादेशातील अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुंटणखाना मालकिणीच्या तावडीतून अल्पवयीन मुलगी पळाल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तिची वेश्याव्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसुफ इरन मुल्ला (वय २१), ताहेरा इरान मुल्ला उर्फ वर्षा (वय २५, दोघे रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साथीदार नईमा, शाहीकुल, बोवकार मंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बांगलदेशातील अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी मूळची बांगलादेशातील असून, तिला भारतात चांगले काम मिळवून देण्याचे आमिष आरोपी नईमाने दाखविले होते. त्यानंतर नईमा तिला घेऊन भारतात आली. पालघर परिसरात अल्पवयीन मुलीचे आधारकार्ड तयार करण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला घेऊन नईमा चेन्नईला गेली. चेन्नईत नईमाच्या मामाने अल्पवयीन मुलीवर अत्यााचार केले. मामाने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने ओळखीतील आरोपी शाहीकुलशी संपर्क साधला. शाहीकुलने तिला बोवकार मंडोल याचा मोबाइल क्रमांक दिला.
मंडाेलने मुलीला धीर देऊन मदत करण्याचा बहाणा केला. पुन्हा बांगलादेशात सोडतो, असे सांगून तिला तो मुंबईत घेऊन आला. मुंबईत आल्यानंतर मंडोलने तिला धमकावून विवाह केला. त्यानंतर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडले. मुलीने नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. मुलीने ओळखीतील युसुफ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला. युसुफने तिला बहीण ताहिरा हिच्याकडे आणून सोडले. ताहीराने तिला डांबून ठेवले. तिला वेश्याव्यवसायास भाग पडले. तिच्या तावडीतून मुलीने सुटका करुन घेतली. तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतले. दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी सागर केकाण आणि अमेय रसाळ यांना याबाबतची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पाेटे, अश्विनी पाटील, तुषार भिवरकर यांनी मुलीची चौकशी केली. त्यानंतर बुधवार पेठेतून युसुफ आणि ताहेरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत दोघे बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.