- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : पीएमपीच्या ताफ्यातील बस रस्त्यातच वारंवार बंद पडत असतातच. त्यामध्ये आता ई-तिकिटींगसाठी सर्व्हर डाऊनची भर पडली आहे. ऑनलाइन तिकीट निघत नाहीत. पीएमपीमध्ये ऑनलाइन प्रणाली सुरू होऊनही महिनाही झाला नाही. मात्र, रोख पैसे असतील तरच बसमध्ये बसा म्हणण्याची वेळ वाहकांवर आली आहे. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे समोर आले आहे.
डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्यासाठी पीएमपीने बसमध्ये ऑनलाइन तिकिटिंगला सुरुवात केली. या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, प्रवासातील सुट्टया पैशांमुळे होणारी बाचाबाची कमी होईल, असा उद्देश होता. पण या मशीन तांत्रिक बिघाडामुळे पीएमपीला फटकाही बसत असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (दि.२३) मनपा ते चिंचवडगांव मार्गावरील बसमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आला. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्रवासी तिकीट काढण्यासाठी वाहकाला पैसे देत असतांनाच मशीनची रेंज गेली. त्यामुळे ऑनलाइन तिकीट निघाले नाही. प्रवासी वाहकाकडे तिकिटची मागणी करत होते.
रोख असेल तरच बसमध्ये बसा...
वाहक देखील तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु मशीनमधून तिकीट येत नव्हते. मशीन बिघडल्याने बस थांब्यावर थांबल्यानंतर नवीन प्रवाशांनी चढू नये असे वाहक सांगत होता. त्यानंतर प्रवाशांना रोख तिकिटे देण्यात आली. पण त्यापूर्वी तिकीट न घेताच काही प्रवासी बसमधून उतरले.
प्रवासात रेंज जातेचं...
मशीन अचानक बंद पडणे, वारंवार चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे, तिकीट निघण्यास उशीर होणे, अशा प्रकारांत वाढ झाली आहे. यातून पीएमपीला आर्थिक नुकसान देखील होत आहे. ई-तिकीट मशीनच्या या अडचणीमुळे अनेक वाहक त्रस्त झाले आहेत. प्रवासी आणि वाहक यांच्यात अनेकदा वाद होण्याच्या घटना घडत आहेत. प्रवासात ऑनलाइन तिकीट काढतांना रेंज जाते. त्यामुळे तिकीट काढणे मुश्किल होत असल्याचे वाहकांने सांगितले.
चिंचवड, चिखली परिसरात काही ठिकाणी रेंज मिळत नाही. त्यामुळे तिकीट निघण्यास समस्या निर्माण होतात. त्यावरही काही तोडगा काढता येईल का? यावर पीएमपी प्रशासन काम करत आहे.
- भास्कर दहातोंडे, आगार व्यवस्थापक, पिंपरी