पुणे: लोकसभा निवडणुकीतच माझ्या लक्षात आले की महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबरच नकोच आहोत. लोकसभा निवडणुकीतच हे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच आता आदिवासी, ओबीसी संघटनांना बरोबर घेत आम्ही विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार आहोत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ॲड. आंबेडकर तसेच नागपूरचे प्रा. अनिकेत मून यांनी न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. त्याची माहिती देण्यासाठी ॲड. आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षण व अन्य विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला. त्यावेळीच आमच्या लक्षात आले की यांना आम्हाला बरोबर घ्यायचेच नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून स्वत:चा अजेंडा राबवायचा आहे.
आरक्षण राज्यघटनेने दिले आहे. त्यासंदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला आहे. आरक्षण हा विकासाचा मुद्दा नाही तर प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रतिनिधित्व मिळण्यालाचा बाधा येत आहे. त्यामुळेच आम्ही या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यघटनेनेच अनेक समाज घटकांना व्यवस्थेत आणले आहे. आता ते या निर्णयाने बाहेर पडले तर प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून सगळा समाज आक्रमक होईल अशी भीती ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी त्याही वेळी असे म्हणालो होते की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असावे, ओबीसींचे ताट वेगळे असावे. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून ज्या प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे, ते मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. आता आम्ही आदिवासी तसेच ओबीसी यांच्या संघटनांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. त्यातील काही जागाही जाहीर केल्या. या संघटनांनाच आम्ही त्यांनी त्यांच्या परिसराचा सर्व्हे करून जागा निश्चित कराव्यात, त्याची यादी आम्हाला द्यावी, त्या जागा आम्ही जाहीर करू असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
जरांगे पाटील, शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडी सध्याच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणाकडे कसे पाहते या प्रश्नांवर उत्तर देण्याचे ॲड. आंबेडकर यांनी टाळले. यावेळी माझा मुख्य विषय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाच होता. त्याचीच माहिती द्यायची होती असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. वंचित बहुजनचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे तसेच वंचितचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.