पुणे : पुरंदर विमानतळाबाबत वारंवार घोषणा करणाऱ्या सरकारने अंदाजपत्रकात त्यासाठी पैशाचीही तरतूद केलेली नाही. दहा वर्षांचा वायदा करून पुणे मेट्रोसाठी केलेली तरतूदही पोकळच आहे. एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्र पुणेकरांना भोपळाच दिला आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
पुणे जिल्ह्याचे अजित पवारच उपमुखमंत्री, अर्थमंत्री आहे. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री, माधुरी मिसाळ राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली. आता पुणेकरांना काही देण्याची वेळ त्यांची होती, मात्र त्यांनी भोपळाच हाती दिला आहे, असे जोशी म्हणाले.
विमानतळ, त्यासाठीचे भूसंपादन वगळणे धक्कादायक आहे. सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी २ हजार गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही, आंबेगावमधील शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली, आता सरकारने त्या शिवसृष्टीच्या संयोजकांना सर्वसामान्य पुणेकरांना जाता येईल इतके प्रवेश शुल्क ठेवण्यासाठी सांगावे, प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी त्यांनी तब्बल ६०० रुपये शुल्क ठेवले आहे याची सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न जोशी यांनी केला.