पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी हाेता. त्यामुळे इच्छुकांपैकी काहींनी पक्षाच्या एबी फाॅर्मवर, तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काहींनी ऐनवेळी अर्ज भरणे टाळले आहे. रिंगणात काेण असणार हे बऱ्याचअंशी स्पष्ट झाल्याने शहरातील आठही मतदारसंघांत प्रमुख स्पर्धक काेण? याबाबतचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसेच्या एंट्रीने आणली रंगत
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीत झाली तीच लढत आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात आहे. याच पक्षाकडून आताचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर सन २००९ मध्ये उभे होते, त्यावेळी ते दुसऱ्या क्रमाकांवर होते. या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दिवंगत गिरीश बापट यांची त्यांनी दमछाक केली होती. मात्र, आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. याच मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत मनसेला फक्त ८ हजार मते होती. त्यामुळे यंदा ही लढत धंगेकर विरुद्ध रासने अशीच होणार हे नक्की आहे. परंतु, बाजी कोण मारणार? हा प्रश्न आहे. मतदार त्याचे उत्तर योग्य वेळी देतील. पोटनिवडणुकीतील पराभवाची कसर काढण्यासाठी भाजप व परिवार सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधून माजी महापौर कमल व्यवहारे यांची बंडखोरी झाली आहे. मतभेद तर आहेतच, उद्धवसेना सन २०१९ मध्ये १५ हजार मतांची धनी झाली होती. त्यावेळचे उमेदवार विशाल धनवडे हे धंगेकर यांच्याबरोबर आहेत, पण ते मतांची किती भर टाकतील ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. लढत दुरंगीच होणार असे दिसते आहे.
पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला होता. लोकसभेत मात्र धंगेकरांना कसबा विधानसभेतूनच सर्वात कमी मतदान झाले होते. अशातच मनसे आणि अपक्ष उमेदवाराच्या एन्ट्रीने दोघांची धाकधूक वाढली आहे. कारण लढत जरी दुरंगी होणार असली तरी मतांच्या विभागणीमुळे कोण बाजी मारणार याकडे कसब्याचे लक्ष लागून आहे.