पुणे : शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी पाहता महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन आता पुणेपोलिस करणार आहेत. यासंबंधीचे आदेशच पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला दिले आहेत. यापूर्वी सिग्नल दुरुस्ती, नवीन सिग्नल बसवण्याचे काम महापालिकेकडे होते.
अनेक वर्षे पुण्यातील सिग्नल यंत्रणा ही महापालिका सांभाळत होती. तर शहरातील वाहतुकीची जबाबदारी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागावर आहे. बंद सिग्नल दुरुस्त करायचा असेल, नवीन सिग्नल उभारायचा असेल, त्याचा मेंटनन्स ठेवायचा असेल तर महापालिकेत चकरा माराव्या लागत होत्या.
सध्या शहरातील ५० टक्के सिग्नल बंद स्थितीत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे जिकीरीचे होत आहे. त्याच धर्तीवर महापालिकेला यासंबंधी सर्व कागदपत्रे व निधी पुणे पोलिसांना सुपुर्द करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सिग्नलच्या व्यवस्थापनासाठी येथून पुढे जो खर्च येणार आहे तो निधी पुणे पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पोलिसांना महापालिकेची वाट पाहावी लागणार नाही.
वास्तव काय?
- शहरातील चौकांची संख्या ७०० ते ८०० च्या घरात आहे. मात्र, त्यासाठी केवळ २०० ते २२५ सिग्नलची व्यवस्था आहे. त्यातील बहुतांश सिग्नल बंद आहेत.
- शहरातील रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनायझेशनची समस्या असल्याने सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. आता सर्वच व्यवस्था पुणे पोलिसांकडे गेल्याने यापूर्वी जो कालावधी लागत होता त्यात आता सुधारणा होऊन शहराची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
- शहरात आणखी सिग्नल बसवण्याची गरज आहे. त्यानुसार लवकरच आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल बसवण्यात येणार आहेत. शहरात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी देखील पुणे पोलिसांचे विशेष लक्ष असेल, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा :
शहरात २०६ ठिकाणी पाणी तुंबण्याची ठिकाणे आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यासह रस्त्यावर व ज्यामुळे वाहतूक कोंडी होते, अशा पाणी तुंबण्याच्या ठिकाणी पाणी पंपिंगद्वारे काढण्याची व्यवस्था करावी, याबाबतची चर्चा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.