पुणे : ग्राहकांकडून येणारी टीडीएसची रक्कम आणि स्टॅम्प ड्युटीकरीता दिलेल्या रकमेत हेराफेरी करून मॅनेजरने कंपनी मालकाला तब्बल ६१ लाख ७३ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, डेक्कन पोलिसांनी स्वप्नील बाळासाहेब पोळ (वय २८, रा. शिवाजी चौक सांगली) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कंपनी मालक शुभम अमित संचेती (वय ३०, रा. बाणेर रोड औंध) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संचेती यांची मिहीर होम्स बांधकाम कंपनी आहे. तत्कालीन कालावधीत आरोपी पोळ हा त्यांच्याकडे कस्टमर रिलेशन मॅनेजर म्हणून काम करत होता. त्या कालावधीत पोळ याने ग्राहकांकडून येणारी टीडीएसची रोकड ५६ लाख रुपये न भरता वैयक्तिक कारणासाठी वापरली. तसेच फिर्यादींनी स्टॅम्प ड्युटीकरीता वेळोवेळी आरोपीच्या खात्यावर पाठवलेले ५ लाख ७३ हजार रुपये न भरता तब्बल ६१ हजार ७३ हजार रुपयांचा अपहार करून कंपनीकडून देण्यात आलेला लॅपटॉपदेखील घेऊन पोबारा केला केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.