पुणे : परीक्षा केंद्रावरील कडक वातावरणामुळे सुरुवातीला भीती वाटली. मात्र, वर्षभर परीक्षेचा चांगला अभ्यास केल्यामुळे आज आम्ही परीक्षा देताेय असे जाणवलेच नाही. मराठी विषयाचे साेपे प्रश्न असल्याने छान उत्तरे लिहिली. पहिलाच पेपर चांगला गेल्यामुळे आता पुढील पेपरही असेच साेपे जातील’, अशी प्रतिक्रिया दहावी बाेर्डाच्या परीक्षेला पहिल्यांदाच सामाेरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
मराठी विषयाच्या पेपरने दहावीच्या बाेर्डाच्या परीक्षेचा गुरूवार दि. २ राेजी प्रारंभ झाला. विद्यार्थी पहिल्यांदाच दहावी बाेर्डाच्या परीक्षा देणार असल्याने शहरातील विविध परीक्षा केद्रांवर पालकांनी माेठ्या संख्येने गर्दी केली हाेती. काही विद्यार्थ्यांचे आई- वडील दाेघेही साेडायला परीक्षा केंद्रावर आले हाेते. परीक्षा केंद्रांवर कडक शिस्तीत पहिल्या सत्रात मराठी पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतरही केंद्राबाहेर माेठ्या संख्येने पालक उपस्थित असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्राबाहेरील हाॅटेल्स, रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागी सर्व परीक्षा संपेपर्यंत बसून हाेते.
पुणे शहरातील सर्वत्र परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर शांततेत पार पडला. साेमवार दि. ६ मार्च राेजी इंग्रजी विषयाचा पेपर हाेणार असून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच दिवसांचा पुरेसा वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावमुक्त असल्याचे निदर्शनास आले.
... अन् हसऱ्या चेहऱ्यांनी विद्यार्थी बाहेर पडले।
मराठीचा पेपर दुपारी २ वाजून १० मिनिटांनी संपला. तीन तास पेपर लिहून थकल्यानंतरही विद्यार्थी हसऱ्या चेहऱ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर पडले. अनेक तासांपासून केंद्राबाहेर ताटकळत उभा असलेले पालकांनीही मुलांचे आनंदाने स्वागत केले. पालकांनी पेपर कसा गेला? हे विचारायच्या आतच मुलेच पेपर साेपा गेल्याचे सांगत हाेते. परीक्षा देऊन आलेले विद्यार्थीही घाेळक्याने उभा राहून पेपरमधील प्रश्न आणि उत्तरे कसे लिहिले, किती मार्क पडतील यावर चर्चा करीत हाेते.
''दहावी बाेर्डाचा पहिलाच पेपर असल्याने भीती वाटत हाेती, पण पहिल्या पेपरचा खूप चांगला अनुभव मला आला. मराठीचा पेपर अपेक्षेपेक्षा खूपच साेपा हाेता. प्रश्न एवढे साेपे हाेते की, लिहायला वेळ पुरला नाही. - उत्कर्ष साबळे''
''दहावीच्या परीक्षेची वर्षभर तयारी केली. परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी वर्गात गेले तेव्हा भीती वाटत हाेती. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर प्रश्नांची उत्तरे कधी लिहून पूर्ण करतेय, असे वाटत हाेते. सर्व प्रश्न साेडविले. - सृष्टी उत्तेकर''
''बाेर्डाची परीक्षा असल्याने पेपर कसा येईल? प्रश्न साेपे असतील का? उत्तरे लिहायला वेळ पुरेल का? याची धाकधूक वाटत हाेती, पण एकदा हातात प्रश्नपत्रिका आली की, भराभर पेपर साेडविला, पहिला पेपर साेपा गेल्याने पुढील पेपरसाठी माझा आत्मविश्वास वाढला आहे. - शुभांगी पांचाळ''
''पहिल्यांदाच स्वत:ची शाळा साेडून दुसऱ्या शाळेत परीक्षा द्यायला आलाे हाेताे. शाळेत कडक शिस्त जाणवत हाेती. जेवढे येईल तेवढे उत्तरे लिहायचे असे ठरवले हाेते; पण पेपर खूपच साेपा हाेता. - अभय जाधव''
''मराठी विषयाची चांगली तयारी केल्यामुळे वेळेत पेपर लिहिला. बाेर्डाची परीक्षा असल्याने भीती हाेतीच, पण ताण घेऊ नकाेस. शाळेतील परीक्षेसारखीच परीक्षा असते, असे सांगत भावाने माझे मनाेबल वाढविले. - अंगारकी गायकवाड''
''परीक्षा केंद्रावरील धीरगंभीर वातावरणामुळे मनात धाकधूक वाढली हाेती. हातपाय थरथरत हाेते; पण अभ्यास केल्यामुळे मनात आत्मविश्वास हाेता. बाेर्डाचा हा पेपर खूपच साेपा हाेता. पुढील पेपरही चांगले जातील असा विश्वास वाटताे. - यश मलकापुरे''