कर्वेनगर : अवकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि खडकवासला धरणातून होणारा विसर्ग अशा परिस्थितीमध्ये अगदी कमरेभर पाण्यातून प्रवास करीत, १३ मीटर उंच अंदाजे ४५ फूट उंच असलेल्या विद्युत खांबावरील उच्च दाबाची नादुरुस्त वाहिनी महावितरणच्या शिवणे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहत्या पाण्यात पोहत जाऊन, पाण्यातीलच विद्युत खांबांवर चढून जीवघेणी कसरत करीत विद्युत पुरवठा सुरळीत केला.
महावितरणाच्या २२० के.व्ही उपकेंद्रातून २२/११ के.व्ही अर्बनग्राम उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी उच्च दाब वाहिनी नादुरुस्त झाली होती त्यामुळे कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी महावितरण शिवणे शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वाहिनीची तपासणी केली असता कोंढवे धावडे स्मशानभूमीच्या लगत असलेल्या नदीपात्रातील खांबावर केबल नादुरुस्त झाल्याचे दिसून आले.
कोंढवे धावडे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर या चारही गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खालून दुथडी भरून वाहणारी नदी, आभाळातून पडणारा जोराचा पाऊस अशा बिकट परिस्थितीमध्ये जिवाची पर्वा न करता व निसर्गाने दिलेल्या आवाहनाला समर्थपणे झेलण्याचे ठरवून सुग्रीव ढेकणे व परमेश्वर चव्हाण यांनी कमरेला दोरी बांधून वाहत्या पाण्यामध्ये पोहत गेले. पाण्यातील पोलवर चढून नादुरुस्त केबलचे काम करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरण शिवणे शाखेचे कर्मचारी सुग्रीव ढेकणे, परमेश्वर चव्हाण, नवनाथ देवकर, राहुल सपकाळ, अजय घुले, रोहिदास मारणे, सहायक अभियंता नरेश किंबहुने हे अधिकारीही सोबत होते.
''नागरिकांचा तक्रारी होत्या. विद्युत पुरवठा सुरळीत करणे अतिशय गरजेचे होते. आमच्या कर्मचाऱ्यांनी जीवघेणी कसरत करीत वाहत्या पाण्यात जाऊन ४५ फुटांवरील नादुरुस्त विद्युतवाहिनी सुरळीत केली आहे.- सुनिल गवळी, कार्यकारी उपअभियंता, वारजे विभाग''