नम्रता फडणीस
पुणे : धुक्याची पसरलेली दुलई...रोमांचित करणारा गारवा...अन सप्तसुरांचा सुरेल साज...अशा मन प्रफुल्लित करणाऱ्या आसमंताने बालेवाडीकरांची दिवाळी पहाट 'स्वरचैतन्या'ने बहरली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोदवादक अमान व अयान अली बंगश यांच्या सरोद वादनाच्या विलक्षण सादरीकरणाने रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. ' वाह ', अप्रतिम अशी दाद रसिकांच्या ओठी उमटली. पंडित विजय घाटे यांचा तबला नि विजय नटेशन यांच्या मृदंगम जुगलबंदीने मैफलीला चार चाँद लावले. उत्तरार्धात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या अभिजात स्वरांनी रसिकांची सकाळ संस्मरणीय केली.
निमित्त होते, डॉ. सागर गणपतराव बालवडकर प्रस्तुत "लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट" मैफलीचे. या मैफलीने बालेवाडीकरांची पहाट आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ए एन पी कॉर्पोरेशन, व्हिजन क्रिएटीव्ह ग्रुप, रांका ज्वेलर्स, आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांचे कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभले. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकणारा आसमंत. पक्ष्यांचा किलबिलाट आणि गुलाबी थंडी अशा सुखद वातावरणात ही दिवाळी पहाट रंगली.
मैफलीला जगप्रसिद्ध सरोदवादक अमान आणि अयान अली बंगश या बंधूंच्या बहारदार सरोदवादनाने प्रारंभ झाला. सरोदच्या तारा झंकारत सप्तसुरां चा सुरेल नजराणा त्यांनी रसिकांसमोर पेश केला. दोघांची सरोद तळपत्या सूर्याप्रमाणे प्रभावीपणे झंकारत होती. सरोदवर आनंद भैरव रागात आलाप, जोड , झाला आणि पंधरा मात्रांचे सादरीकरण त्यांनी केले. अमान आणि अली बंगश यांची सरोद आणि पं विजय घाटे यांचा तबला व विजय नटेशन यांची मृदंगमवरील जुगलबंदी मैफलीचे आकर्षण ठरली.
मैफली च्या उत्तरार्धात भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील संगीत रत्न पं. वसंतराव देशपांडे यांचे नातू राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय मैफल रंगली. ' अलबेला सजन आयो रे ' या बंदिशी ने त्यांनी मैफली ला प्रारंभ केला. ' 'बिंदिया ले गयी हमारी मछारिया' ही पंडित वसंतराव देशपांडे यांची ठुमरी त्यांनी सादर करीत रसिकांची मने जिंकली. तू सुखकर्ता तू दुःखहर्ता हे भजनही त्यांनी सादर केले.कानडा राजा पंढरीचा या अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषात अवघा आसमंत दुमदुमून गेला.संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेले. त्यांना निखिल फाटक ( तबला), मिलिंद कुलकर्णी ( हार्मोनियम), निनाद मुलावकर ( बासरी), विशाल धुमाळ ( की बोर्ड) , प्रसाद जोशी (पखवाज) यांनी सुरेल साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.