पुणे : महोत्सवात प्रथमच सादरीकरण केलेल्या अविनाश कुमार यांची किराणा घराण्याची अभिजात गायकी.... उस्ताद आलम खाँ यांच्या सरोदच्या मंजूळ सुरांनी जिंकलेली रसिकांची मने... पंडित साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा या पिता-पुत्राच्या गायकीच्या जुगलबंदीने स्वरमयी झालेली सांज... अशा सांगीतिक कलाविष्कारांची जादू रसिकांनी गुरुवारी अनुभवली.
डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर यांचे अप्रतिम व्हायोलिन सहवादन महोत्सवाच्या उत्तरार्धाचे आकर्षण ठरले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या महिला कलाकारांना दाद देत मानवंदना दिली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवसही सूरमयी ठरला. गायकांच्या सप्तसुरांची उधळण अन् वादकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार यांच्या बहारदार गायनाने सुरुवात झाली. राग पुरीया धनाश्रीद्वारे त्यांनी आपल्या सादरीकरणास सुरुवात करीत विलंबित एकताल बंदिशी, त्यानंतर द्रुत तीन तालातील 'पायलिया झंकार मोरी' आणि एकतालातील बंदिश सादर केली. संत कबीर यांची रचना असलेल्या 'मन मन फुला फुला फिरे जगत में' हे भजन सादरीकरण केले. त्यानंतर मैहर सेनी घराण्याचे सरोदवादक आलम खाँ यांनी वडील ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मैहर सेनी घराण्यातील प्रचलित अशा हिंडोल-हेम या मिश्र रागातील रचना सादर केल्या. राग मिश्र पिलूमध्ये रूपक तालातील गीत सादर करत त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली.
पं. साजन आणि पं. स्वरांश मिश्रा यांच्या सुरेल गायकीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महोत्सवाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर यांनी व्हायोलिनच्या मोहक तारा छेडत, स्वरांशी खेळत उत्कृष्ट वादनाचे दर्शन रसिकांना घडविले. ही वादन मैफल कधी संपूच नाही, अशी भावना रसिकांची झाली. वन्स मोअर म्हणत रसिकांनी मांडव दणाणून सोडला.
''कोरोनानंतर हे माझे पहिलेच सादरीकरण आहे. या ठिकाणी माझी कला सादर करणे, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यापुढील काळात भारतात आणखी काही कार्यक्रम सादर करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी मिळेल, अशी मला खात्री आहे. -उस्ताद आलम खाँ, सरोद वादक''
''सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरण करण्याचा आनंद शब्दातीत आहे. प्रारंभी एका लहानशा सभागृहात सुरू झालेला हा महोत्सव आज इतक्या भव्य स्वरूपात पार पडताना पाहून अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवासारखे जाणकार रसिक अन्यत्र पाहायला मिळणे, दुर्मीळ आहे. - डॉ. एन. राजम, ज्येष्ठ व्हायोलिन वादक.''
महोत्सवात आज
- मनाली बोस (गायन)- श्रीनिवास जोशी (गायन)- राहुल शर्मा (संतूर)- पं. अजय चक्रवर्ती (गायन)