पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त नागरिकांना पुणे महापालिकेने कारवाईचा दणका दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून जानेवारीत ७ हजार ५९३ नागरिकांकडून ६० लाख २९ हजार ९८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ९ लाख १९ हजार २५८ रुपयांचा दंड वसूल केला आहे.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, वर्गीकरण न करता ओला आणि सुका कचरा देणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, जैववैद्यकीय कचरा, प्राण्याद्वारे होणारी अस्वच्छता, कबुतरे आणि पारव्यांना उघड्यावर खाद्य टाकणे अशा विविध कारणांसाठी हा दंड वसूल केला आहे. यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने शहारातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावीपणे ही कारवाई होत नव्हती. यामुळे महापालिकेने इंदूर महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर गस्ती पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी ३१ लाख ८२ हजार २१०, बांधकाम राडारोडा टाकल्याप्रकरणी ७ लाख ५ हजार ६५०, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाकडुन २ लाख २३ हजार रूपये दंड वसुल केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणा०याकडुन १ लाख ७९ हजार १४० रूपयांचा दंड घेतला आहे.क्षेत्रीय कार्यालयाचे नाव आणि दंडाची रक्कमकोंढवा-येवलेवाडी - ९ लाख १९ हजार २५८औंध-बाणेर - ६ लाख १८ हजार ७१४सिंहगड रस्ता - ५ लाख २२ हजार ६५०हडपसर - ५ लाख ०७ हजार ४५०नगर रस्ता-वडगाव शेरी - ४ लाख ४५ हजार ५००कोथरूड-बावधन - ४ लाख ०३ हजारवारजे-कर्वेनगर - ३ लाख ९६ हजार ०५०धनकवडी-सहकारनगर - ३ लाख ४३ हजार ५८०घोले रोड-शिवाजीनगर - २ लाख ९३ हजार ७८०ढोले पाटील रस्ता - २ लाख ३३ हजार २५४वानवडी रामटेकडी - २ लाख १८ हजार ५००भवानी पेठ - २ लाख १६ हजार ९४०कसबा-विश्रामबाग - २ लाख १३ हजार १५०येरवडा-कळस-धानोरी - २ लाख १० हजार ८००बिबवेवाडी - १ लाख ४४ हजार ३५४
शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे . नागरिकांनी अस्वच्छता करू नये, यासाठी जनजागृतीही केली जाते. या पुढेही या कारवाईची तीव्रता आणखीन वाढविण्यात येणार आहे. - संदीप कदम, उपायुक्त , घनकचरा विभाग विभाग, पुणे महापालिका