श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : कोथरूडमधील थोरात उद्यानामध्ये महापालिकेच्या वतीने मोनोरेल प्रकल्प साकारण्यात येणार होता. पण त्याला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला. कारण त्यासाठी कित्येक झाडे कापून सिमेंटचे ७० हून अधिक खांब उभे केले जाणार होते, म्हणून नागरिकांनी अशी मोनोरेल नको, आमचे उद्यानाच राहू द्या, ही भूमिका घेतली होती. त्यामुळे महापालिकेला नमते घ्यावे लागले आणि हा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा करून विषय लावून धरला होता.
पुणे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या वतीने थोरात उद्यानामध्ये मोनोरेल प्रस्तावित होती. त्यासाठी सुमारे साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यामध्ये थोरात उद्यानातील ४० टक्के झाडे कापण्यात येणार होती. पादचारी मार्ग नष्ट करण्यात येणार होता. म्हणून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पावर जोरदार संताप व्यक्त करत विरोध केला. मे. ब्रेथवेट कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये दहा फूट उंचीचे ७० पिलर उभारण्यात येणार होते. या ठिकाणी कोणत्याही नागरिकांनी मोनोरेलची मागणी केलेली नव्हती. किंबहुना त्याची गरज देखील नव्हती. तरी देखील महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून हा प्रस्ताव देण्यात आला होता. लोकांचा संताप आणि विरोध लक्षात घेता हा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा लागला.
या एकूण प्रकरणावर ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. अखेर २१ मे २०२४ रोजी मोटार वाहन विभागाने हा मोनोरेलचा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याबाबतचे पत्र दिले आहे. संबंधित ठेकेदाराला देखील तसे पत्र देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता हितेंद्र कुरणे, उपअभियंता राजेंद्र शिपेकर यांनी दिलेल्या पत्रामध्ये नमूद आहे.
पाच महिन्यांचा लढा !
मोनोरेलबाबत कार्यवाही सुरू असताना नागरिकांनी २६ जानेवारी २०२४ रोजी स्वाक्षरी मोहिम घेतली. त्यामध्ये ५०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर ५ फेब्रुवारी आक्षेप घेऊन नागरिकांनी महापालिकेकडे प्रकल्प रद्दची मागणी केली. महापालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार रवींद्र धंगेकर आणि खासदार वंदना चव्हाण यांनी देखील आयुक्तांना प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. या विषयी सुरवातीपासून ‘लोकमत’ने देखील नागरिकांच्या बाजूने आवाज उठविला होता. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले, स्वाक्षरी मोहिम राबविली.
थोरात उद्यानातील मोनोरेल कायमस्वरूपी रद्द झाल्याचे पत्र मोनोरेल हटाव कृती समितीला महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या वतीने आयुक्तांना धन्यवाद दिले- श्वेता यादवाडकर, कै. तात्यासाहेब थोरात उद्यान मोनोरेल हटाव कृती समिती