लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द अखेर खासदार अमोल कोल्हे बुधवारी सत्यात उतरवला. अमोल कोल्हे बुधवारी बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार' झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दर्शवीत घोडीवर स्वार झाले.
बैलगाडा शर्यत हा केवळ शेतकऱ्यांचा नाद न राहता, केवळ मनोरंजन न राहता ग्रामीण संस्कृती आणि पर्यटनास चालना मिळेल असे चित्र भावी काळात दिसण्यासाठी बैलगाडा शर्यतींचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं प्रतिपादन अमोल कोल्हे यांनी यावेळी केले. तर देशातील पहिला खासदार आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून सहभागी झाला असल्याचे चित्र सर्वांनी पाहिले, अशी भावना नागरिकांमध्ये होती.
अमोल कोल्हे आज शेखरदादा पाचुंदकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मातोश्रींनी आधी दृष्ट काढली आणि परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली, असं अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
दरम्यान, निमगाव खंडोबा येथे माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या खंडोबाच्या यात्रेत लाखो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. तर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर घाटात नवसाचे बैलगाडे घाटात पळविण्यात आले. मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे आणि बैलगाडा शर्यतींवर बंदी यामुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. परंतु कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आणि बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी यात्रेत सहभाग घेतला.