आळेफाटा : स्वतः च्या पंधरा दिवसांच्या नवजात मुलीचा अपहरण झाल्याचा बनाव करून पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून देणाऱ्या परप्रांतीय महिलेविरुद्ध आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक यांनी कसोशीने केलेल्या तपासात नवजात मुलीला कालव्याच्या पाण्यात फेकल्याचे निष्पन्न केले. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाटा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय महिलेने शुक्रवार (दि.३) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नवजात मुलीला डोस दिला. यानंतर नगर- कल्याण महामार्गाने घरी येत असताना समोरून चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी महिलेकडून नवजात मुलीचे अपहरण करून पलायन केल्याची तक्रार दुपारी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल केली. आळेफाटा पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी तपासाची चक्रे फिरवली. महिलेने तक्रारीत सांगितलेल्या घटनाक्रमाचा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. मात्र, विसंगती दिसल्याने पोलिसांना या महिलेवरच संशय आला. अधिक तपास केला असता नवजात बालकास परिसरातून जाणाऱ्या पिंपळगाव जोगा धरणाचे कालव्यात टाकल्याची कबुली या महिलेने दिली.
दरम्यान, यानंतर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. काल तसेच आजही आळेफाटा पोलिस, जुन्नर रेस्क्यू टीम सदस्य व ग्रामस्थ पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात टाकलेल्या नवजात मुलीचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे पुढील तपास करत आहेत.