पुणे : राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे. त्या संदर्भात आता संगणकप्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागातील ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, “एक मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत संगणकप्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेला येत्या तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल. त्या संदर्भातील पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे.”
दरम्यान, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. महिलेलाला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील, असेही त्यांनी सांगितले.
१ मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील. तसेच १ मे पूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत नोंद होणार नाही.- सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई फेरफार प्रकल्प