श्रीकिशन काळे
पुणे : दुर्गम भागातील डोंगरावर नाचणीचे पीक घेऊन पोटाची खळगी भरली जाते. पण त्या नाचणीच्या पिकासाठी डोंगराला जाळावे लागते. ज्यामध्ये जैवविविधता नष्ट होते. यावर उपाय म्हणून त्या दुर्गम भागातील लोकांना जर पोटासाठी धान्य दिले, तर ते डोंगर जाळणार नाहीत. त्यासाठी टेल्स ऑर्गनायझेशनने यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील काही डोंगर खाक होण्यापासून वाचले आहेत.
वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात नाचणी घेताना डोंगरास आग लावतात. काही मिनिटांत सह्याद्रीच्या डोंगरांची राखरांगोळी होते. तसेच मोठं प्रदूषणही होतं. केवळ नाईलाज असतो म्हणून नाचणी पीक घेण्याकरिता डोंगर पेटवले जातात. सह्याद्री कसा वाचवता येईल ? याच करिता एक खारीचा वाटा म्हणून टेल्स संस्थेच्या लोकेश बापट आणि सहकाऱ्यांनी पुढाकार घेत गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून डिगी वस्ती, खानू गावातील कुटुंबास आठ ते दहा किलो नाचणी, गूळ देण्यास सुरुवात केली.
आठ महिन्यांपासून जनजागृती
गावातील २५ ते २७ कुटुंबाला धान्य देण्याचे काम संस्थेमार्फत होत आहे. याचा परिणाम म्हणजे या गावातील लोकांनी गेल्या आठ-दहा महिन्यांत डोंगर जंगलास हात लावला नाही. समाजातील अनेक घटक, मोठ्या एनजीओ, सीएसआरसारख्या माध्यमांद्वारे एकत्रित आले पाहिजे. दुर्गम गावे, वस्त्या दत्तक घेऊन जनजागृती केली, तर मोठ्या प्रमाणावर डोंगराला आग लावण्याचे प्रमाण कमी होऊन जैवविविधता वाचणार आहे, असे लोकेश बापट यांनी सांगितले.
का पेटवतात डोंगर ?
डोंगराळ, दुर्गम भागात धान्य पिकवण्याजोग्या सपाट शेतजमिनी नसतात. त्यांना उपजीविकेसाठी डोंगर जाळून नाचणीचे पीक घ्यावे लागते. या ‘शिफ्टिंग कल्टिवेशन, झूम, स्लॅश ॲन्ड बर्न’ पद्धतीत उंच वाढलेली झाडे हिवाळ्यात बुंध्यापाशी तोडून त्यांचा पसारा उतारावर पाडला जातो. कडक उन्हाळ्यात खोड, फांद्या, पाने वाळल्यानंतर डोंगर उतार खालून वर पेटवला जातो. नंतरच्या पावसाळ्यात तुटपुंज्या सपाट जमिनीवर नाचणीची रोपे केली जातात. ती हातभर उंच झाल्यावर उपटून, जळून भिजलेल्या डोंगरावर पेरली जातात. दिवाळीनंतर नाचणीच्या पिकाची कापणी करून ते खाली आणतात, वाळवतात आणि झोडतात. अशा धोकादायक खडतर कष्टांनंतर दोन पाच पोती नाचणी मिळते. वर्षभरासाठी खायला लागते त्यापेक्षा जास्त मिळाली तर पाडीव भावाने (२० रु किलो) विकून व्यापाऱ्याकडून जेमतेम इतर किराणा घेण्याइतके पैसे त्या लोकांना मिळतात. हा प्रकार थांबला पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी सांगितले आहे.
...तर जंगले पुन्हा हिरवी होतील
वृक्षप्रेमींनी आणि संस्थांनी दुर्गम भागात जाऊन या स्थानिकांना नाचणी शेतीपासून परावृत्त केले आणि त्यांना गरजेचे धान्य मोफत पुरवले, तर पाच-सात वर्षात ही जंगले पुन्हा हिरवी होतील. या लोकांच्या गरजा अगदी माफक आहेत हे त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात येईल.