पुणे : गुजरातमध्ये भाजपने सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभा केला असला तरी त्यांची वाटचाल मात्र वल्लभभाई पटेल यांच्या ध्येयधोरणांपासून दूरच आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
काँग्रेसभवनमध्ये सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष अरविंद शिंदे तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी गटनेते आबा बागूल, माजी महापौर कमल व्यवहारे तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तिवारी यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, सरदार पटेल देशाचे पहिले गृहमंत्री होते. त्यांनी पंडित नेहरू यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल अन्य धर्मीयांच्या विरुद्ध द्वेष पसरवणारी असल्याने त्यांच्यावर बंदी घालावी, असे मत व्यक्त केले होते. मात्र लोकशाहीवादी असलेल्या पंडित नेहरू यांनी ही मागणी अमान्य केली. हा इतिहास विसरून भाजप आता पंडित नेहरू यांच्यावर टीका करत सरदार पटेल हिंदुत्ववादी विचारांचे होते, असा चुकीचा समज देशात पसरवत आहे.