पुणे :पुणे महापालिकेने करवाढीसाठी यंदा पहिल्यांदाच लकी ड्रॉ योजना राबवली होती. त्यात पाच भाग्यवंत पुणेकरांना पेट्रोल कार तर १५ भाग्यवंतांना इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस जाहीर झाले. याशिवाय एकूण ४५ भाग्यवंतांना लॅपटॉप, आयफोनसारखी बक्षीसे जाहीर झाली होती. पण या लकी ड्रॉला सव्वा महिना होउनही विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे पालिकेने जाहीर केलेले बक्षीस कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेने नागरिकांना मिळकतकर भरायला प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदाच ही योजना राबविली आहे. त्यात, लकी ड्रॉ योजनेअंतर्गत भाग्यवंत मिळकतधारकांना पाच पेट्रोल कार, 15 ई-बाइक, 15 मोबाइल फोन, 10 लॅपटॉप, अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात लॉटरी काढण्याच्या दोन महिने आधी (मे महिन्यात) महापालिका आयुक्तांनी बक्षिसांचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतरही लॉटरी निघेपर्यंत केवळ काही मोजक्याच बक्षिसांच्या साहित्याची खरेदी झालेली होती.
लॉटरीनंतर नेमकी कोणती कार खरेदी करायची यावरून वेळकाढूपणा सुरू होता. त्यामुळे, विजेत्यांमध्ये नाराजी पसरली. महापालिकेने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून गणेशोत्सवात बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता लॉटरी काढून सव्वा महिना उलटला तरी विजेत्यांना बक्षिसे मिळालेली नाहीत. त्यामुळे पालिकेने जाहीर केलेली बक्षीसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.